'माणुसकीचे वारकरी'

       आज कोल्हापुरात सकाळी रूममधून घाईघाईत बाहेर पडत होतो. पूरग्रस्तांना खाद्यपदार्थ पुरविण्याची मदत, म्हणून लगबग सुरु होती. मी गाडीवर निघालेलोच होतो कि, एक महत्वाचा कॉल आला. गाडी बाजूला घेऊनच बोलणं झालं. अन्न पॅक झालंय आणि आता ते कुठे पोहोचवायचं हे त्या गाडीवानांना सांगण्यासाठी ते माझी वाट बघत थांबले होते. बारीक पावसाची रिपरिप सुरूच होती. म्हणून बोलून झाल्यावर घाईघाईतच माझा लाडका ‘आयफोन’ जॅकेटच्या बाजूच्या खिशात ढकलला आणि मी मार्गस्थ झालो. गाडीत पेट्रोल जेमतेम चार-एक किलोमीटर्स साठी पुरेल एवढंच त्यामुळे इतर कुठेही न जाता तडक त्याच ठिकाणी पोहोचायचं म्हणून मी गाडी विद्यापीठाच्या ८ नंबरच्या गेटमधून आत घातली. बराच पुढे आलो आणि तिकडे वाट बघत थांबलेल्या लोकांना फोनवरून जागा सांगून पुढे निघण्याची सूचना करावी म्हणून फोन काढण्यासाठी खिसा चाचाचपला तर फोन नव्हता. जीव कापरा झाला. गाडी थांबविली परत फिरलो. मग आठवलं. पेट्रोल कमी आहे. तसाच मग पुन्हा माघारी फिरलो आणि ठरलेल्या जाण्याच्या दिशेला निघालो विद्यापीठाच्या १ नंबर गेटवर ती गाडी स्वयंसेवकांसह माझी वाट बघत थांबली होती. त्यांना उजळाईवाडीकडचा मदत पोहोचवण्याचा पत्ता सांगितला आणि मग माघारी फिरलो. विद्यापीठातून मला फोन हरवल्याचं जिथे लक्षात आलेलं त्या रोड वरून पुढे-पुढे जात गाडीवरूनच फोन शोधू लागलो. बॉईज हॉस्टेल ते NCC भवन रोडच्या उताराने गाडी बंद करून खाली उतरलो शोधत-शोधत बराच पुढे आलो. रस्त्यात चौकश्या केल्या, दुसऱ्या नंबरवरून फोने लावून पाहिले. तेंव्हा फोन बिझी लागत होता. त्यानंतर काही वेळाने लावला तर रिंग होत होती पण कुणीही उचलत नव्हते. आता मात्र जीव कासावीस झाला. कारण लाडका फोन तर गेलाच पण त्याच फोनवर महापुरतील अनेक गरजूंची आणि मलाही गरज असणाऱ्या अनेकांचे फोन नंबर्स होते. त्यांचे फोन येत राहिले असणार आहेत. पण आता त्यांचा आणि माझा कॉन्टॅक्ट होऊ शकला नव्हता. त्यामुळे माझा आणि त्यांचाही खोळंबा होणार होता.

हताश होऊन तसाच निघून येत होतो. शेवटचा पर्याय म्हणून विद्यापीठाच्या एका सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलवरून फोन लावला तर फोन उचलला गेला आणि “आम्हाला जस्टच हा फोन इथे इथे गवतात भिजत असलेला सापडला..!” असं त्यांनी सांगितलं आणि स्वतः जिथे आहोत तिथलं ठिकाण सांगितलं. मागचे काही दिवस पावसामुळे आपला उद्योग-धंदा बंद ठेवून, बाहेरही न पडू शकता घरातच राहिलेले आणि आज जरा पाऊस कमी असल्याने विद्यापीठात थोडं फिरून, पाणी पाहायला आलेले एक सन्मित्र श्री अबुसाब सनदी आणि त्यांचा एक सहकारी, असे दोघेजण बॉईज हॉस्टेल मागच्या रोडच्या चढतीजवळ माझी वाट बघत उभे होते. तिथे गेल्यावर अगदी सहजच त्यांनी मला ओळखलं आणि काहीकाळ कुठेतरी भिजत पडलेला माझा फोन सुखरूप माझ्या ताब्यात दिला. हल्लीच्या काळात सायकल, दुचाकी, चारचाकीच काय तर ट्रक किंवा मोठे कंटेनर ट्रकसुद्धा चोरी झाले किंवा हरवले तर सहज पचविले जातात तर फोन किस झाड कि पत्ती? त्यामुळे आता आपला फोन मिळणारच नाही अशी काही अंशी मानसिक समजूत केलेला मी, जरासा जास्तच सुखावलो. त्या बंधूचे शतशः आभार मानून मी पुढे निघता झालो. पुढे गेल्यावर, काही वाटलं म्हणून परत जाऊन त्यांची चौकशी केली. तर हे माझे नवे मित्र श्री अबुसाब सनदी, जवळच पतंजलीचे एक आउटलेट चालवतात. माणूस अत्यंत नम्र, हसतमुख आणि सहृदयी वाटला. त्यांना त्यांच्या व्यवसाय-धंद्यात अनेक प्रगतीची शिखरे सर व्हावीत अशा शुभेच्छा दिल्या, फोन नंबर घेतला आणि परत भेटू असा निरोप देऊन पुरग्रस्तांच्या मदतीच्या मार्गावर; ह्या एका मदतगाराची मदत मिळवून मार्गस्थ झालो. जात असताना काही बोध झाला आणि वाटून गेलं कि, माणुसकीच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना तुम्हाला, तसेच तुमच्यासारखे माणुसकीचे मार्ग चालून आलेले कितीतरी 'माणुसकीचे वारकरी' भेटतील, भेटत जातील. त्यासाठी आपणही फक्त आणि फक्त त्याच अर्थात 'माणुसकीच्या वाटेचे वाटसरू किंवा वारकरी’ असणं जरुरीचं राहील.

-मीराध 
(प्रमोद संजीवनी ज्योतीराम कसबे), सोलापूर

०९/०८/२०१९, १५:२५

(ज्ञानयोग)

Comments

Post a Comment