आपल्या पाल्यांचं भविष्य रस्त्यावर आलंय...
उच्चशिक्षणाच्या उंबरठयावर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठीही
आपल्या ज्ञानसमृद्ध अशा महाराष्ट्र राज्यामध्ये, विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मिळून जवळजवळ १३००० प्राध्यापकांच्या जागा आजच्या तारखेला रिक्त आहेत आणि रुजू असलेल्या प्राध्यापकांपैकी जवळ-जवळ ४० ते ७० % प्राध्यापकांची पदे येत्या दोन-तीन वर्षांत सेवानिवृत्तीस पात्र आहेत. बहुतेक महाविद्यालये आणि विद्यापीठांत अशा रिक्त ठिकाणी, तासिका तत्वावर किंवा कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. ही नियुक्ती काही महिन्यांच्या कालावधीसाठीचीच मर्यादित असते. पूर्णवेळ सेवेत नसल्याने अशा प्राध्यापकांना अनेक अडचनींना आणि अपमानास्पद परिस्थितीला मुक्यानेच तोंड द्यावे लागते. सगळीकडे अशीच अत्यंत चलाखीने आणि पॉवरगेमने आजवर झाकलेली ही एक छळवादी परिस्थिती आहे. परंतु असं असतानादेखील हे 'पर्मनंट' नसलेले प्राध्यापक आपापली कामे इमाने-इतबारे करतात आणि त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनातही आपले निर्धारित दायित्व चोख बजावतात. स्वतःचं अस्तित्वंच असं अस्थायी असताना आणि त्यांच्या मनामध्ये स्वतःच्या अनिश्चित, अधांतरी आयुष्याचं आभाळाएवढं दुःख असतानाही ते 'आपल्या पाल्यांना' उत्तमोत्तम शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध राहतात. स्वतःचे वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक आयुष्य आणि त्यातल्या हजारो विखारी प्रश्नांची झळ किंवा तिचा लवलेशही ते आपल्या पाल्यांच्या अध्ययनामध्ये येऊ देत नाहीत. आज परिस्थिती अशी आहे, कि राज्यातील महाविद्यालये अथवा विद्यापीठांकडून त्यांचा फक्त आणि फक्त वापरच केला जातोय. त्यांच्या जगण्या-मरण्याची भ्रांत इथे कुंणाला म्हणजे कुणालाच पडलेली नाही. अनेक अर्ज, विनंत्या, याचना करूनही केवळ मोठमोठी आश्वासनं आणि घोषणांच्या पलीकडे त्यांच्या फाटक्या पदरी आजवर काहीच पडलेलं नाही.
कोव्हीडच्या ह्या जीवघेण्या काळात अनेक उद्योगधंदे बंद झालेले असतानाच ह्या अशा प्राध्यापकांना तर आपल्याकडील कृतघ्न व्यवस्थेकडून सोयीस्कररित्या दुर्लक्षितच केलं गेलेलं आहे. कित्येक प्राध्यापकांच्या आर्थिक अडचणींमुळे ह्या आजारात त्यांचे किंवा त्यांच्या कुटुंबांचे आयुष्य तर संपवलेच आहे पण कित्येकांचे भरले संसारही मोडले आहेत. हे सगळं भयावह चित्र पाहता, कित्येकांनी तर आपल्या ह्या फाटक्या आयुष्यात आणखी कुणाची भागीदारीच नको किंवा कुणाच्या आयुष्याची अवहेलनाही आपल्याकडून व्हायला नको म्हणून आयुष्यभर एकटंच जगण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनेकांनी स्वतःलाच आपल्या घरच्यांपासून तोडूनही टाकलं आहे. अनेकांची तर जगण्याची उमेदच हरवलेली आहे. कित्येकांनी आत्महत्येचा विचार देखील करून ठेवला आहे. परंतु त्यांची परिस्थिती कशीही असली तरी त्यांनी आपल्या अध्यापनकार्यात झोकून देऊन काम करणं अखंडितच ठेवलेलं होतं आणि आजही आहे. यादरम्यान अनेकदा विनामोबदलाही ते राबले आहेत. आजच्या घडीला तर त्यांना कसलेच आर्थिक पाठबळ नसल्याने ह्या प्राध्यापकवर्गाची दुर्दशा न पाहण्या-बोलण्याच्या लायकीची झाली आहे. तरीही ते सर्व प्राध्यापक त्यांच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिल्यामुळेच आज आपली अनेक पाल्ये अविरतपणे उच्चशिक्षण घेऊ शकत आहेत, हे मान्यच करावं लागेल. पण एक गोष्ट आजवर तुम्ही आम्ही कधीच विचारात घेतली नव्हती कि ही अशी 'पर्मनंट' नसलेली अनेक प्राध्यापक मंडळीदेखील तुमच्या आमच्यासारखी माणसेच आहेत. त्यांच्यावरही कुटुबाची जबाबदारी आहे. त्यांनाही स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार आहे. आपल्या मुलांचं भविष्य उज्वल करून देणाऱ्या प्राध्यापकांचं स्वतःचंच भविष्य हे असं अंधारात राहावं, असं खरंच आपल्याला वाटतं का? असं आपल्याला वाटावं, इतके कृतघ्न खरंच आपण आहोत का? हा आता आपल्याला प्रामुख्याने चिंतन करण्याचा विषय बनला आहे.
आपण आपल्या पाल्याला ज्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवतो तिथे प्रवेश घेण्यापूर्वी 'तिथले सर्व प्राध्यापक लोक तज्ञ आहेत का?' हे आवर्जून पाहतो पण ते तज्ञ असले तरी 'मानसिक दृष्ट्या संतुलित आणि समाधानी आहेत का? कि जेणेकरून 'त्यांच्या कार्याला ते योग्य न्याय देऊ शकतील' हे आपण कधीच पाहत नाही. किंवा कदाचित ते तिथे आपल्याला जाणूनबुजून कधीच दाखवलं जात नाही. कदाचित आपल्यालाही ते आजवर कधी गरजेचंच वाटलेलं नसणार. आपल्या पाल्याच्या प्रगतीकडे बघून आपण संतुष्ट राहतो आणि आपण किती सुजाण पालक आहोत असं स्वतःस सांगून, स्वतःचीच पाठ आपण मन भरून थोपटतो. हरकत नाही, पण आता ही हलगर्जी आपल्याकडून कधीच व्हायला नको कारण तो प्राध्यापक त्याच्या विषयात कितीही तज्ञ असला तरी तो मनाने संतुलित आणि प्रफुल्लितच जर नसेल तर तो त्याची १००% ऊर्जा लावून तुमच्या-आमच्या पाल्याला शिक्षण देऊ शकेल का? हा विचार करणं आता गरजेचं आहे. शिवाय त्यालाही सहनशक्ती नसेल का? तो ही शेवटी आपल्यासारखा हाडामासाचा माणूसच नाही का? तर ह्यावरसुद्धा आता आपण तमाम पालकांनी सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचं आहे.
आपल्या पाल्याच्या यशाचा खरा वाटेकरी असलेला प्राध्यापक, जगालाच पाहिजे, तो मनाने, शरीराने आणि विचाराने निरोगी राहिलाच पाहिजे. हे निरोगीपण त्याला तेंव्हाच येईल जेंव्हा तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल. ही सक्षमता या सर्व प्राध्यापकांना देण्यास, संबंधित महाविद्यालये, विद्यापीठे किंवा एकूणच राज्य तथा राष्टीय प्रशासन अयशस्वी ठरत असेल तर पालक म्हणून आपल्यालाच आता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. ह्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे? तर जेंव्हा कधी आपण आपल्या पाल्याला शिक्षण संकुलात प्रवेश घेण्यासाठी घेऊन जाऊ, तिथले सर्व प्राध्यापक 'पर्मनंट' आहेत का? अर्थातच ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत का? हे आवर्जून पाहावं. "तसे असेल तरंच इथे प्रवेश घेऊ" असं तिथे ठणकावून सांगण्याच्या धारिष्ट्य आपण आता बाळगायलाच हवं. त्यासाठी आपण आग्रही राहिलो तर आणि तरच आता काहीतरी होईल आणि आपण त्या सर्व प्राध्यापकांना कृतज्ञतापूर्ण अशी त्यांची खरी गुरुदक्षिणा देऊ शकू. आपण सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही अशीच भूमिका ठेवली तर आणि तरच आपल्या राज्याच्या आणि देशाच्या उच्चशिक्षणाचं भविष्यात काहीतरी भलं होईल. आपण ह्यासाठी शासनस्तरावर देखील आवाज उठवायला हवा. अन्यथा ह्या सद्यपरिस्थितीमुळे भविष्यात येणाऱ्या भयानक अशा शैक्षणिक आणि पर्यायाने सामाजिक कोडगेपणाला आपणही प्रशासनाइतकेच जबाबदार असू.
तर ह्या कोडगेपणापासून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी आजपासूनच आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. असं पालक म्हणून मला वाटतंय. विचार करा, अशा या रोगराईच्या तसेच पाऊस-पूरच्या काळातसुद्धा आपल्या हक्क आणि स्वाभिमानासाठी पुणे तसेच नागपूर येथे रस्त्यावर येऊन, लेकराबाळांपासून दूर राहून, उपाशी-तापाशी, संयमाने आणि विधायक पद्धतीने हे सर्व प्राध्यापक आंदोलन करीत आहेत. ह्या सर्व उच्च विद्याविभूषित तरीही हतबल अशा प्राध्यापकांच्या पाठीशी आपण पालकांनी खंबीरपणे उभारलं पाहिजे. त्या ज्ञानदात्यांच्या ऋणातून काही अंशी मुक्त होण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण एक गोष्ट कायमची लक्षात घ्यायला हवी कि 'उच्चशिक्षणाच्या भविष्यासाठी प्राध्यापक भरती होणे आता नितांत गरजेचे आहे.' ज्या देशातील शिक्षण व्यवस्था भक्कम तोच देश महासत्ता बनण्यास पात्र असू शकेल. जगात सर्वात जास्त तरूण जनता असलेल्या भारत देशाचं भविष्य घडवणारे परीसच जर मातीत मिळाले तर मग देशाची ही लोहासारखी मजबूत पिढी चुकीच्या पद्धतीत घडून किंवा बिघडून गेली तर पश्चातापाशिवाय काहीच हातात उरणार नाही. ह्या देशाची दुर्दशा आपल्याला बघवणारही नाही. तेंव्हा ही वेळ दवडणं धोक्याचंच ठरेल.
माझा बोलणं परखड वाटत असेल तर त्यासाठी क्षमस्व, पण हा माझ्याकडून तुम्हा सर्वाना कसलाही सल्ला किंवा उपदेश नसून तुमच्यासारखाच एक सुज्ञ पालक म्हणून तुम्हा सर्वाना हक्कानं केलेली कळकळीची विनंती आहे.
चला, उठा हीच योग्य वेळ आहे.
"आपल्या पाल्याचं आणि पर्यायानं आपलं भविष्य घडवणारा प्राध्यापक स्वतःही घडलाच पाहिजे !"
"जर प्राध्यापकच असे निराधारपणे रस्त्यावर येत असतील तर आपल्या मुलांनी त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय करायला हवं ?"
"आज ते रस्त्यावर आहेत, अर्थात उद्या आपली मुलंही ह्या परिस्थितीचे शिकार होवू शकतील, म्हणूनच सांगतोय वेळीच सावध होवूया, कारण आपल्या पाल्यांचं भविष्य रस्त्यावर आलंय..!"
- तुमच्यातलाच एक पालक
Great initiative. Thanks to that parent.
ReplyDeleteहल्ला बोल हल्ला बोल जुलमी सत्ता पर हल्ला बोल!
ReplyDeleteसहमत..! 🙏🙏
DeleteNeed to share this thought in different locations via social networks.... articles in news paper.
ReplyDeleteAgreed..! Can you provide any source sir..?
Deleteसहमत..!
Deleteआपण काही मार्ग द्याल का?
🙏🙏