विज्ञान रुजलं पाहिजेच...
आज दि. २९ जानेवारी २०१७ या दिवशी, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर आणि संशोधक विद्यार्थी तसेच शिक्षक या गटात 'आविष्कार' हा संशोधन महोत्सव, येथील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी या अधिविभागाच्या अत्यंत नेटक्या नियोजनासह पार पडला. मानव्यता, शिक्षण तथा सामाजिक शास्त्रे, भूगोल, अन्नशास्त्रे, अभियांत्रिकी, तंत्रज्ञाने, औषध-वैद्यकशास्त्रे तसेच मुळ-शास्त्रांच्या नवनवीन संकल्पना इथे नव्या जोमाच्या संशोधकांकडून हाताळताना पाहायला मिळाल्या. यात अनेकविध उपकरणांच्या प्रतिकृती आणि विविध शास्त्रीय फलकांचा समावेश होता. यातील सहभागी सर्वच अभ्यागतांचा चिकित्सक आणि शास्त्रीय-व्यवहारापुरक दृष्टिकोण या निमित्तानं आवर्जून पाहायाला मिळाला. आविष्कार ह्या महोत्सवाचा हेतूच मुळी संशोधनासाठी विद्यार्थ्यांना उद्यूक्त करणे हा होय. इथे उपस्थित प्रत्येकजन खुप काही नवीन शिकत होतं आणि स्वत:च्या संशोधनासाठी प्रेरीत होत होतं. सर्वांच्याच चेहर्यावर एक विलक्षण पोटभरीचं समाधान आणि तितकाच उतावळा चिकित्सकपणा पाहून महोत्सव त्याच्या योग्य दिशेने जातोय या भावनेनं आयोजकांनाही हायसं वाटत होतं.
याच दरम्यान ह्या महोत्सवात सहभागी, एका स्पर्धकासमवेत ही गोड चिमुरडीही आली होती. या अशा महोत्सवात तिला आणलं; ह्याबद्दल खरंतर तिच्या पालकांचे अनेक आभार आणि आभाळभर कौतुक. महोत्सवात फिरणार्या ह्या मुलीच्या त्या कुतूहलपुर्ण नजरेनं, आयोजकांतलाच एक असणार्या मला असिम कृतकृत्यपण आणि समाधान देवू केलं. तिची नजर साफ सांगत होती कि तिला ह्या प्रतिकृतीला पाहून विज्ञानाप्रति आत्मियता निर्माण होती आहे आणि तीही उद्यपित होती आहे, असलंच काहीतरी भन्नाट करायला. आज या महोत्सवातली ही प्रतिकृती पाहताना तिच्या मनात संशोधनाची एक छोटीशी ठिणगी पडलेली मला दिसली. तिला ह्या प्रवाहात कायम ठेवण्यात जर तिचे पालक यशस्वी झाले; तर ही पडलेली ठिणगी मुलीच्या माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षणांवेळी नक्कीच एक मशाल बनलेली असेल आणि पुढे जावून ज्यावेळेला ही मुलगी इथे आता असलेल्या उपस्थितांच्या वयाची झालेली असेल तेंव्हा त्या मशालीचं रुपांतर अनेकांना ह्या संशोधन मार्गावर मार्गस्थ करू पाहणार्या एका उपयुक्त दिपस्तंभात झालेलं असेल यात शंका नाही.
असं माझं मन मला पटकन सांगून गेलं आणि मनाला खूप बरं वाटलं. त्याचबरोबर हाही विचार मनात आला की, जर का आपल्याकडच्या सर्वच स्तरातल्या पालकांनी, आपापल्या पाल्यांना 'उगाच' कुठल्याही अंधश्रद्धेच्या, दैववादाच्या आणि मग त्याचं फलित म्हणून येणार्या परावलंबनाच्या उतरंडीवर न नेता अशा काही संशोधन महोत्सवांना, विज्ञान प्रदर्शनांना नेलं, त्यांच्यातला विज्ञानवाद, विवेक जागा होईल असे संस्कार केले तर हा माझा देश; आदरणीय, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या स्वप्नातला सार्वभौम देश व्हायला सज्ज असेल असे मला वाटते.
-प्रमोद संजीवनी ज्योतीराम कसबे
२९/१२/२०१७ रा. ११.५५
(ज्ञानयोग)
Copyright @ Niyaara Arts Production

Very striking point you have made sir...
ReplyDeleteThank You Sir..!
Delete