नागराज अण्णाला वाढदिवसानिमित्त एक भावनिक साद..!
नागराज अण्णाला वाढदिवसानिमित्त एक भावनिक साद..!
(सैराटचा, पहिल्याच दिवशी पहिलाच शो पाहिल्यानंतर मनात निर्माण झालेले उत्कट भाव)
आपलं फार मोठं काहीतरी हरवलंय याच भ्रांतीत कायम असावं, त्याच्या नव्हतेपणाच्या हुरहुरीत सतत
झुरत रहावं पण 'नेमकं आपण
काय शोधतोय?' हेच मुळात
आपल्याला ठाऊक नसावं...
किंवा,
मनांत
खोलवर कुठेतरी रुजलेलं अन् आपल्याही नकळत जोपासलं जाणारं
किंवा,
आपल्यांस
जाणिव असूनही काही कारणांमुळं स्वत:हून दाबून आणि बंदिस्थ ठेवलेलं 'प्रेम' कुणाच्या तरी आकस्मात समोर येण्यानं
उफाळून यावं...
तुटून
जावेत सारे पाश...,
आणि मग
त्या मुक्त प्रेमाची आपल्यांस इतकी नशा चढावी कि, त्या कैफेला 'झिंगाट' होऊन मनसोक्त अनुभवण्याच्या नादात
स्वत:चं अस्तित्वही विसरुन बेधुंद, बेबंध, बेलगाम म्हणजेच अगदी 'सैराट' व्हावं...!
कित्येक जन्मांपासून आपण ह्या गोष्टीला/व्यक्तीला शोधत होतो याची खात्री पटावी आणि आत्ता ती गवसलीय या विलक्षण आनंदानं भारुन जावं....
अश्या भावना उत्पन्न करु शकणारी गेल्या कैक महिन्यातली ही एकमेव कलाकृती...,"सैराट"
आजवर ज्याला मी स्वत:चं पहिलं प्रेम मानलंय; असं माझं विश्व, ज्यात 'कविता', 'नाटक', 'लेखन', 'दिग्दर्शन', 'रेखाटन', गायन आणि 'अभिनय' हे सगळंच असायचं. यांतच भारलेलं असण्यात खरं जगणं मानणारा मी; आयुष्याच्या धावपळीत यांच्याकडे फक्त एक मनांत साठवलेलं 'अव्यक्त प्रेम' म्हणुन बघु लागलो होतो. जे मिळणं आता फक्त वेळेच्या हाती आहे असा समज करुन घेऊन, काहीसा निष्क्रियच झालो होतो. माहित नव्हतं परत यांकडे परतेन कि नाही...,
पण आदरणीय नागराज मंजुळे (नागराज आण्णा) यांचा सैराट पाहिला अन् स्वत:च्याच साखळदंडातून स्वत:ला मुक्त करुन आजंच परत लेखणी घेऊन सज्ज झालोय ते आता परत कधीच न थांबण्यासाठी.
मुर्छित पडलेला कलाकार, नकलाकार, कलासेवक आज एका प्रदिर्घ ग्लानी नंतर उठून बसलाय. आणि याचं श्रेय जातं, नागराज आण्णा फक्त तुला. आजवर तू माझा आदर्श राहिलासंच, पुढंही राहशील. पिस्तुल्या साठीचा राष्ट्रीय पुरस्कार मा. प्रतिभाताई पाटील यांच्याकडून तुला मिळत असताना, तसेच फॅन्ड्रीसाठीही तो तुला मिळत असताना, भरुन आलेला माझा ऊर आजही जाणवतोय मला. विलक्षण उर्मीची पुन्हा एकदा अनुभुती येतीय आज.
पण हे सगळं आजही परत एकदा का होतंय माहितीये..?
तुझ्या चित्रपटांच्या अद्भूत तंत्रांमुळं...!
तुझ्या चित्रपटातल्या कथा लिहिल्या आणि अभिनयात उतरवल्या जात नाहीत तर जगल्या जातात. तू कथा जगतोस अन् प्रेक्षकांनाही जगायला लावतोस. तुझ्या दिग्दर्शनांत कथानकांतले बारकावे अचुक हेरायचं जबरी कौशल्य आहे.
जसं कि, फॅन्ड्रीतल्या जब्याची त्या जिन्सच्या पँटसाठीची अगतिक तळमळ, हिरोईन कडे बघत ईंप्रेशन मारत वरातीत बेधुंद नाचताना, हलगी वाजवताना सावळ्या चेहर्यावरही उमटणारं ते निर्भेळ तेज, मग पुन्हा तिथंच बत्ती धरायला लागल्या नंतर जब्याच्या गालांवरुन ओघळणारं ते पाणी आणि त्या पाण्यानी गालावर सुकलेला तो ओघळ...,
आह..! काळीज पिळून निघतं यार..!
जातीनं लादलेलं ते जगणं लपवण्यासाठीची धडपड स्क्रिनवर बघताना जीव नुसता कासाविस झालेला बघ, त्या जब्याचा आणि आमच्यातल्या जब्याचाही...
आणि तो शेवटचा दगड...., तो शेवटचा दगड खरंच जिव्हारी लागला रे आण्णा..!
निशब्द बाहेर पडलो होतो तेंव्हा चित्रपटगृहातून, त्यानंतरही बराच वेळ तसाच होतो.
सलाम आहे बॉस..!
“आणि मग सैराट…!”
सैराट बद्दल काय बोलणार आता?
एवढच म्हणेन, "खुप कमी असे चित्रपट किंवा नाटक पहायला मिळतात, ज्यात अनेकविध भावनांमध्ये प्रेक्षकांना एकत्र बांधून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो. 'सैराट' त्या कलाकृतींपैकीच एक आहे, किंबहूना त्यांच एक उत्तम प्रमाण आहे.
आणि हेच खरं तर नागराज मंजुळेंचं कसब आहे..!"
अशा यशस्वी चित्रपटांची अपेक्षा फक्त याच दिग्दर्शकाकडून केली जावू शकते. किंबहुना केली गेली, किंवा तुच भाग पाडलंस आम्हाला वेळोवेळी ती अपेक्षा करायला..
असं रसग्रहत्याला संमोहित करून आपलंसं करुन सोडणं, हेच खरंतर तुझं यश आहे आण्णा.
सैराट, ज्यात हास्य, करमणूक, उत्कंठा, अधिरता, समाधान आणि काळजाला पिळवटून टाकणारी विदारकता एकत्र एकाच साच्यात बांधणं (माझ्या माहितीनुसार, जे आजवर मराठी चित्रपट सृष्टीत किंवा कदाचित भारतीय चित्रपट सृष्टीतही) कधीच कुणाला जमलेलं नाहीये. ते तु लिलया जमवलयंस. म्हणूनच तर केवळ विलक्षण आणि अतुलनिय गोष्ट आहे ही तुझी.
खरंतर सैराट बघुन निर्माण झालेल्या माझ्या काही वैयक्तिक भावना मला मांडायच्या होत्या, त्या अशा कि,
“मी स्वत:ही एक कलाकार आहे. चित्रकला; मातीकाम; व्यंगचित्रण; कातरकाम; वक्तृत्व; काव्यलेखन; ललित लेखन; नाट्यलेखन; दिग्दर्शन; नकला; अभिनय; गायन; इत्यादींबरोबरच अजुनही बरंच काही करु शकतो, पण या कला क्षेत्राला मी फक्त एक छंद म्हणुन जोपासत आलोय आजवर. त्याला काही मर्यादा मीच आखुन ठेवलेल्या होत्या. कला ही आपल्या अभिव्यक्तीची भाषा किंवा दिशा नाही, असाच काही न्युनगंड मनात बाळगुन, मी आपलं जीवरसायनशास्त्र, त्यातलं संशोधन, अध्ययन, अध्यापन, वगैरे वगैरे हेच आपलं आयुष्य आणि भवितव्य. आपण केवळ यातंच रहायचं. कलेला 'फक्त' कलाच मानून तिला ह्या सार्या गोष्टींच्या कलेनंच, फक्त कधीतरी व्यक्त होण्याचं साधन मानून, स्वत:लाच एका नको असलेल्या पण व्यवहारीकदृष्ट्या बरोबर (?) वाटत असलेल्या साच्यात फिट्ट बसवण्यात गर्क करून घेतलेलं मी..!”
“आपण अडकलोय खरं, पण कशांत? का? यातून मुक्त कसे, कधी होणार?”
यांच गुरफटीत असताना, आणि ह्यातून निसटण्याच्या प्रत्येक प्रयत्नाअंति त्यात अजुनच रुतलं जात
असताना,
आपलं
स्वत:चं 'गम्य' पण 'अज्ञात' काहीतरी बेभानपणे शोधत असताना,
स्व-अस्तित्वाच्या धुसर सिमांना पुसत-झटकत असतानाच,
एक लख्ख आणि सप्तरंगी क्षितिज दाखवलंस मला, जिथे आता स्वत:च्या परिसिमा आणि सामर्थ्याच्या अमर्यादा, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी, सहज आणि अगदी पृथकपणे समजु लागल्यात मला. अभिव्यक्तीची नवी भाषा आणि ह्या नव्या रंगीत दृष्टीची भेट अगदी तुझ्याही नकळत देऊन गेलास आण्णा तू.”
“यासाठी, खरंच मी तुझा आजन्म ऋणी आहे...!”
“नागरज आण्णा, तुला संपन्न, समृद्ध आणि आरोग्यपूर्ण असं उदंड आयुष्य लाभो, तुला माझंही आयुष्यमान मिळो..!”
भावी वाटचालीस आदरपुर्ण शुभेच्छा...!
- डॉ.
प्रमोद संजीवनी ज्योतीराम कसबे, सोलापुर
(तुझा एक
कलाकार शिष्य)
दि. २९/०૪/२०१६, रा. ११:३६




छान विश्लेषण...!!!
ReplyDeleteधन्यवाद डॉ. खिलारे सर..! 🙏
Delete