"इस्स स्मार्ट सोलापूर ?"

(IS SMART SOLAPUR ?)  

 

होम मैदानाच्या आणि हरीभाई देवकरन प्रशालेच्या समोरच्या बाजूस असणाऱ्या, जिल्हा परिषद कार्यालयाच्या पार्श्व-भिंतीवर, स्मार्ट सोलापूरच्या लखलखीत वैभवाला अधोरेखित करण्याच्या स्तुत्य हेतूनेच, कैक कष्टाअंति कलात्मक सजावट आणि सोलापूरचा नामोल्लेख करणारी नयनरम्य चित्रे काढून त्या चित्रांना आणि काही सेल्फीगर्क सोलापूरकरांनाही पद्धतशीरपणे रंगवण्यात, आपलं प्रविण जिल्हाप्रशासन उल्लेखनीयरित्या यशस्वी झालेलं आहे.

  
  

कालच (अर्थात ११/१०/२०२०) त्यातलं एक चित्र, ज्यामध्ये "I ❤️ SOLAPUR" असा उल्लेख फुलांच्या पार्श्वभूमीवर केलेला होता, ते मी अभिमानानं फेसबुकवर शेअर केलेलं होतं. पण जसं मला इथल्या 'चांगल्या' गोष्टींचं कौतुक करता येतं तसंच माझ्या शहरातल्या काही 'अतुलनीय' गोष्टींवर भाष्यही करता येतंच की. नव्हे नव्हे तो तर माझा अधिकार किंवा त्याहीपेक्षा माझं कर्तव्य जास्त आहे. 

 

तर किस्सा असा कि काही कामानिमित्त मी माझ्या सोलापूर सर्वांप्रमाणेच माझीही असणारी एक नैसर्गिक गरज वजा लघूशंकेच्या निरसनासाठी दुपारी १ वाजल्यापासून ते सायं. ०५:३६ पर्यंत मी ह्या अतिप्रशस्त परिसरात अक्षरशः हिंडत होतो. तिथे चौकशी केल्यानंतर, बहुतेक अकबराच्या काळात सुरू असलेल्या "अशा" काही महत्त्वपूर्ण सार्वजनिक 'स्थळांचे' भग्न अवशेष बघायला तर मिळालेच पण त्या जवळपासच, नजिकच्या काळात नव्यानेच स्थापन करून ठेवलेली अशी नव'स्थळं' सुद्धा होती, जी उद्घाटन समारंभानंतर अगदी आजपर्यंत कुलूपबंद अवस्थेत असल्याची माहीती तिथेच मिळाली. उद्घाटनाच्या तारखेचा तपशील आजूबाजूला बेदकारपणे वाढलेली गवत व झुडूप मंडळी बोंबलून सांगत होतीच. कळस तर तेंव्हा होता जेंव्हा एका कार्यालयीन इमारतीत सुद्धा अशी जागा उपलब्ध नव्हती. शिवाय जिल्हा परिषदेच्या, सिद्धेश्वर प्रशालेच्या, सिद्धेश्वर तलावाच्या जवळच मध्यभागी असलेल्या आणि सोलापूरच्या पारपत्र कार्यालय अर्थात पासपोर्ट ऑफिसच्या प्रवेशद्वारालगतच असलेल्या चार ते पाच स्मार्ट टॉयलेट्सची अवस्था तर इतकी भारी होती कि त्यांची कीवच काय तर किळस वाटण्याच्याही पलीकडे पोहोचली होती. 

 

नाही, मला ती वैश्विक विधी संपन्न करायला घरी किंवा इतरही ठिकाणी योग्य अशा खूप जागा मिळाल्या असत्या, कारण हे सोलापूर आहे, म्हणजे आप्पलंच किंग्डम. पण मुद्दा होता तो त्या विविध कार्यालयांचा, प्रशासकीय यंत्रणेचा, त्या यंत्रणेच्या प्राधान्यक्रमाचा.  

 

सोलापूरकर मित्र-मैत्रीणींनो, यावर आपण प्रशासनाला कधी जाब विचारणार आहोत का? आणि या सोयींच्या अशा अवस्थेला प्रशासनाबरोबरच आपणही तितकेच जबाबदार आहोत असा वाटतं का? आणि असल्यास हे मान्य करतोय का?

- डॉ. प्रमोद ज्योतीराम कसबे (एक सोलापूरकर)
१२/१०/२०२०, २२:१५ 
(इस्सस्मार्ट सोलापूर)

तळटीप: काल रात्री एक मित्र फोनवर वैतागून बोलत होता. त्यालाही आलेला असाच अनुभव तो खास सोलापुरी शैलीत (अर्थात सोलापुरात राग आल्यावर वापरतात त्या काही अलंकारित सोलापुरी शब्दात) सांगत होता, म्हणूनच हा आधी कधीतरी लिहिलेला ड्राफ्ट आठवला.

Comments

Post a Comment